लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बेट वस्ती जवळ असलेल्या गाढवे मळ्याच्या शेजारी ओढ्यालगत गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 पोलिसांनी शनिवारी (ता.16) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी 28 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक दादू राखपसरे (वय 60, रा. बेटवस्ती, लोणी काळभोर, ता.हवेली, जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर काटे हे एक पोलीस अंमलदार असून ते गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 च्या पथकामध्ये कार्यरत आहेत. सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना गाढवे मळ्याच्या शेजारी ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारू एक इसम तयार करीत आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी आरोपी राखपसरे हा हातभट्टी दारू तयार करताना आढळून आला. पोलिसांनी या छाप्यात 25 हजार रुपये किंमतीचे 500 लिटर रसायन आंबट व प्लॅस्टीकच्या कॅनमध्ये 3 हजार रुपये किंमतीची 30 लिटर दारू असा सुमारे 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस अंमलदार योगेश पाटील व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, शेखर काटे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिगंबर जगताप करीत आहेत.