लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली.
साहिल राजु शेख, (वय- 24, रा. 38, मॅजेस्टिक पार्क, बी बिल्डिंग, फ्लॅट नं. 1206 वडाची वाडी रोड, उंड्री) व जैद जावेद खान (वय -22 रा. धंदा फ्लॅट नं 203 गणराज स्वप्नपुर्ती फेज-2 हांडेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील साहिल शेख याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे, तर जैद खान याच्याकडून दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई, तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्र वापरणारे यांचे विरोधात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते.
सदर आदेशाचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 6 चे कार्यक्षेत्रात 7 नोव्हेंबर रोजी गस्त घालीत असताना काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आल होता. त्यानुसार आरोपी साहिल शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याच्या अधिक तपासादरम्यान रविवारी (ता. 10) जैद खान याचे कडुन कौशल्यपूर्व तपास करून दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
सदरची कामगीरी गुन्हे शाखा युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.