छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेंद्रा एमआयडीसीमध्ये मक्याची टाकी फुटल्याची घटना शुक्रवारी( 15 नोव्हेंबर) रोजी घडली आहे. यामध्ये मक्याखाली दबून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मद्यनिर्मिती कारखान्यात ही घटना घडली आहे. किसन हिरडे (वय 50), विजय गवळी (वय 40) दत्तात्रय बोरडे (वय 40) असे मृत व्यक्तींचे नावे असून एका मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तर प्रशांत सोनवणे, प्रसाद काकड, वाल्मीक शेळके नावाच्या व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, सदर टाकीमध्ये 3 हजार टन इतका मका होता. मात्र अचानक टाकी फुटल्याने आजूबाजूच्या परिसरात काम करणारे चार मजूर हे मक्याखाली दाबले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
रॅडिको एन. व्ही. डिसलरीज या मद्य कंपनीमध्ये ही घटना घडली असून ही मद्य कंपनी 2008 पासून कार्यरत आहे. कंपनीच्या स्टोअर भागामध्ये 3 हजार टन इतकी मका होती. पत्र्याच्या कोठारामध्ये ही मका साठवून ठेवण्यात आली होती. या टाकीला काही दिवसांपासून गळती लागली होती. ही गळती थांबवण्यासाठी पिडीत लोक हे टाकीची दुरुस्ती करत होते. मात्र अचानक टाकी फुटली आणि ढिगाऱ्याखाली दाबल्या जाऊन 4 जणांचा मृत्यू झाला.