नवी दिल्ली : कोणतीही डिजिटल गोपनीय फाईल असो किंवा इतर कोणतंही डॉक्युमेंट त्यासाठी पासवर्ड सेट केला जातो. पासवर्ड लवकर लक्षात राहावा म्हणून तो जास्त किचकट न ठेवता साधासुधा ठेवला जातो. त्यात NordPass ने नुकतेच वार्षिक संशोधन ‘टॉप 200 मोस्ट कॉमन पासवर्ड्स’ची सहावी एडिशन जारी केली आहे.
या लिस्टमध्ये 44 देशांचा समावेश असून, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पासवर्डची लिस्टच समोर आली आहे. या अहवालानुसार, जगात आणि भारतात सर्वाधिक वापरलेला पासवर्ड 123456 हा आहे. जगभरात हा पासवर्ड वापरणाऱ्या 30,18,050 युजर्सपैकी 76,981 भारतीय असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. याशिवाय, जगात दुसरा सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड 123456789 आहे, जो भारतात चौथ्या क्रमांकावर आहे.
इंटरनेट युजर्सकडे सरासरी 168 पासवर्ड असतात, अशी देखील माहिती समोर आली आहे. हे संशोधन NordStellar च्या पार्टनरशिपमध्ये केले गेले आणि त्याच्या निष्कर्षांनुसार, जगातील सर्वात सामान्य पासवर्डपैकी निम्मे पासवर्ड हे qwerty, 1q2w3e4er5t आणि 123456789 सारख्या साध्या कीबोर्ड शॉर्टकटने बनलेले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.