पुणे : पोलीस असल्याचे सांगून चोरट्याने सराफ व्यावसायिकाची ८८ हजार रुपयांची सोनसाकळी चोरून नेणाऱ्या चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कर्वेनगर परिसरात घडली. याप्रकरणी सराफ व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार सराफ व्यावसायिकाची कर्वेनगर सराफी पेढी आहे.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांसारखी टोपी घातलेला चोरटा सराफी पेढीत आला. त्याने सराफ व्यावसायिकाला पोलीस असल्याचे सांगितले. सोनसाखळी दाखविण्यास सांगितले. सोनसाखळी गळ्यात घातली. त्यानंतर खिशातून पाकीट काढून सराफ व्यावसायिकाला दिले. पाकिटावर ५० हजारांची रोकड असे लिहिले होते. त्यानंतर दोन मिनिटांत आलो, असे सांगून चोरटा पेढीतून बाहेर पडला.
सराफ व्यावसायिकाने चोरट्याने दिलेले पाकीट उघडून पाहिले. तेव्हा पाकिटात पैशाऐवजी वृत्तपत्रातील एक पुरवणी घडी घालून ठेवल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटीत तपास करत आहेत.