पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक मतरदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. अनेक जागा महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामधील एक जागा म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघ. हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार चेतन तुपे आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यात हायहोल्टेज सामना होत आहे. त्यामुळे पुण्यात सध्या हडपसर विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा रंगली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येत असून तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन विठ्ठल तुपे हे विद्यमान आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने यावेळीही आमदार चेतन तुपे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पण सगळ्यात हडपसरचा राजकीय इतिहास काहीसा वेगळाच आहे.
2008 मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत याठिकाणी तीन निवडणुका झाल्या असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी येथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.
2019 मध्ये हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार चेतन तुपे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने चेतन तुपे यांना उमेदवारी देत मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे उभा केली आहे.गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकांच्या जोरावर चेतन तुपे यांच्याकडून आक्रमक प्रचार केला जात आहे. पुढील पाच वर्षांमध्ये असाच वेगवान विकास साधायचा असेल, तर पुन्हा मला संधी द्या, असे आवाहन तुपे यांच्याकडून केले जात आहे. सध्याच्या घडीला तुपे यांचे पारडे काहीसे जड आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पक्षाकडून माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप यांच्याकडे स्वच्छ प्रतिमेचा आणि निष्ठावंत उमेदवार म्हणून पहिले जाते. तसेच शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी जगताप यांना ताकद दिली आहे. त्यांच्याकडून महायुतीने केलेल्या चुकीच्या कामाचा पंचनामा केला जात आहे. तसेच चेतन तुपे यांनी अजित पवारांना साथ दिल्याने शरद पवार त्यांच्याविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे चेतन तुपे यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही.
हडपसर विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरण देखील तेवढेच महत्वाचे आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ 2008 पासून अस्तित्वात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार येथे एकूण 5 लाख 4 हजार 259 मतदार आहेत. येथे अनुसूचित जाती मतदारांची संख्या अंदाजे 73,779 आहे जी 15.82 टक्के आहे. त्याच वेळी, आदिवासी मतदारांची संख्या 4,011 आणि मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 88,144 म्हणजेच 18.9 टक्के आहे. या तीन समाजाचे मतदार ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतात, त्याचा विजय सोपा होतो. त्यामुळे या मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. हडपसरच्या इतिहासात आजपर्यंत सलग दोन टर्म आमदार होण्याची किमया कोणालाही साधता आलेली नाही. हडपसरमध्ये दुसरी टर्म न देण्याचा पायंडा येथील मतदारांनी कायम ठेवला आहे. या मतदारसंघात असणारी अंतर्गत गटबाजी आणि पुढील टर्मसाठी लावण्यात येणारी फिल्डिंग यामुळे नेहमीच विद्यमान आमदार पराभूत होत आले आहेत.
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे प्राबल्य मोडीत काढत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघात शिवसेनेचे नेते महादेव बाबर यांनी विजय प्राप्त केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये बाबर यांना पराभूत करून भाजपचे योगेश टिळेकर विधानसभेत पोहचले होते. २०१९ मध्ये योगेश टिळेकर यांना पराभवाचा धक्का देत राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी आमदारकी मिळवली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप जोमात असल्याने इतिहासाची पुनरावृत्ती होणार? की आमदार तुपे गड राखणार? याची तुफान चर्चा मतदारसंघामध्ये रंगली आहे.