शिरूर : घोडगंगा कारखान्याचे चेअरमन व शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र ऋषीराज अशोक पवार यांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नाही तर १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी देखील केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आत्तापर्यंत तीन आरोपीना अटक करण्यात आले आहे. भाऊसाहेब वीरा कोळपे, तुषार संजय कुंभार, मयूर संजय काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संशयित महिला आरोपी पसार झाली आहे. याप्रकरणी ऋषिराज अशोक पवार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदर आरोपींना यापूर्वी कोर्टाने पोलीस कोठडीत रवानगी केली होती. सदर पोलीस कोठडीची मुदत आजरोजी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने वाढीव दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास बाकी असून त्याकामी आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज असल्याबाबत सरकारपक्षाने बाजू मांडली. या प्रकरणातआरोपी कुंभार व काळे यांचे वतीने अॅड. गणेश पी. माने यांनी युक्तिवाद केला.
याबाबत पोलीस निरीक्षक केंजळे म्हणाले कि, घडलेला प्रकार खरा असून आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, तर एक संशयित महिला आरोपी फरार झाली आहे. लवकरच तिला पकडण्यात पोलिसांना यश येईल. आरोपींवर अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे.