पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवाळीनंतर प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोल्हापूरला निघालेल्या तरुणाकडील ६ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा कोल्हापूरचा आहे. तो तेथे एका सराफी पेढीत कामाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी तो पुण्यातील एका सराफाला दागिने देण्यासाठी आला होता. सराफ व्यावसायिकाला दागिने दिल्यानंतर तो अडीच वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट एसटी बस स्थानकात आला. कोल्हापुरकडे जाणाऱ्या बसमध्ये त्याने दागिन्यांची पिशवी ठेवली.
तरुणाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी खुर्चीवर ठेवलेली पिशवी चोरून नेली. पिशवीत ६ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात येताच तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील करत आहेत.