-बापू मुळीक
सासवड : 202 पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये खूप अटीतटीची निवडणूक पहावयास मिळत आहे. यासाठी अगोदर दुरंगी लढत झाली होती, तर आता तालुक्यात एकमेकांचे मित्रच यांची तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. यामध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. प्रचार हा पूर्णपणे शिगेला पोहोचला आहे. त्यासाठी आता उमेदवार विजय शिवतारे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सासवडच्या पालखी मैदानावर दुपारी साडेचार वाजता होणार आहे.
यासाठी शिवतारे कडून जोरदार सभेसाठी तयारी झाली आहे. तर प्रामुख्याने आजच्या सभेत मुख्यमंत्री नक्की काय बोलणार यासाठी गुंजवणी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयटी पार्क, आंतरराष्ट्रीय बाजार, पुरंदर उपसा जानाई शिरसाई योजना अशा विविध प्रकल्पावर काय घोषणा होणार, हे आज पाहायला मिळणार आहे.
तर उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्त राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून याच पालखी मैदानावर ते येत आहेत. रविवार (दि. 17) रोजी दुपारी दोन वाजता ही सभा होणार असल्याचे सांगितले आहे. पक्ष फुटी नंतर निष्ठावान आमदार म्हणून संजय जगताप यांनी प्रामाणिकपणे चांगले काम केले आहे. त्यासाठी शरद पवार यांनी त्यांना चांगली ताकद दिली आहे. यासाठी शरद पवार काय बोलणार हे सुद्धा पुरंदर हवेली मध्ये पहावे लागणार आहे.
तसेच अजित पवार गटाकडून संभाजीराव झेंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पावार रविवार( दि. 17 )रोजी साडेचार वाजता पालखी मैदानावर सभेसाठी उपस्थित होणार आहे. यासाठी अजित पवार काय विकास भूमिका मांडणार याबाबत सुद्धा पुरंदर हवेली कर त्यांचे संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे. या सभामुळे पुरंदर हवेलीत नक्की कोणता उमेदवार बाजी मारणार हे पाहण्यास पुरंदर हवेलीतील नागरिक टक लावून बसले आहेत.