पर्थ: बॉर्डर गावसकर करंडक मालिकेत २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणारी पहिली कसोटी भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहणारी असेल. कारण, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमची खेळपट्टी वेगवान आणि उसळी घेणारी असल्याचे क्युरेटरचे म्हणणे आहे. पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुख्य क्युरेटर इसाक मॅकडोनाल्ड खेळपट्टीसंदर्भात म्हणाले, ही ऑस्ट्रेलिया आहे, हे पर्थ आहे. वेगवान आणि उसळी घेणारी खेळपट्टी उभारली आहे.
पर्थ कसोटी अगोदर १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान भारताच्या दोन संघांतील नियोजित लढत रद्द करण्यात आली आहे. खेळाडूंना नेटमध्ये सराव करण्यास मुबलक वेळ मिळावा, या मागील मुख्य कारण आहे. यामुळे भारतीय संघ कोणत्याही सराव सामन्याविना पर्थमध्ये खेळण्यास उतरेल. ऑप्टस स्टेडियमजवळील ‘वाका’ या पारंपरिक स्टेडियमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या खेळाडूंची सरावाची सोय करण्यात आली आहे. खेळपट्टीवर किमान १० मिमी हिरवे गवत सोडणार आहे. गेल्या वर्षीसारखीच खेळपट्टी आहे. पहिले काही दिवस खेळपट्टी उत्तम दर्जाची असेल. गवत आहे, म्हणजे गती मिळणार. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान संघांचे गोलंदाजी आक्रमण तेज होते, आता त्याचीच पुनरावृत्ती होईल, असे मॅकडोनाल्ड म्हणतात.
ऑप्टस स्टेडियमच्या या खेळपट्टीवर गत वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा ८९ धावांवर दुसऱ्या डावात खुर्दा उडाला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवर भेगा निर्माण झाल्या होत्या. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क या ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी दोन्ही डावांत २० पैकी १२ बळी घेतले होते. नुकत्याच आटोपलेल्या एकदिवसीय मालिकेत शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफच्या माऱ्यासमोर १४० धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला होता.