मुंबई: सिनेअभिनेता सलमान खानवर ‘मै सिकंदर हू’ गाणे लिहिणाऱ्याला व सलमानला ठार मारण्याची धमकी देऊन ५ कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. सलमान खानला धमकी देणारा हा त्याच्यावर गाणे लिहिणारा यूट्यूबर सोहेल पाशा हाच असल्याची धक्कादायक बाब गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेने सोहेल पाशा (२४) याला कर्नाटकच्या रायचूर, मानवी येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.
कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर असलेल्या सिनेअभिनेता सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या येण्याचे सत्रच सुरूच आहे. ७ नोव्हेंबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वरळी येथील मुख्यालयात असलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर सलमान खानसह ‘मैं सिकंदर हू’ या गाण्याच्या गीतकाराला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकावत ५ कोटींची मागणी केल्याचा संदेश आला. संदेशामध्ये ‘मै सिकंदर हू.. ये जीसने भी लिखा है. उसे हम खतम कर देंगे. जो सलमान को मदत करेगें उसेभी छोडेगें नही. सलमान को अगर बचना है, तो पाच करोड देने पड़ेगें’ लॉरेन्स बिष्णोई, असे नमूद करण्यात आले होते. वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाने स्थानिक वरळी पोलिसांसह सर्व यंत्रणांना याचा अलर्ट दिला. वरळी पोलिसांनी या संदेशाची गांभीर्याने दखल घेत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तचर कक्षाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने तपास करत कर्नाटक गाठले. गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल नंबरधारक व्यंकटेश नारायण याचा शोध घेत त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. नारायण हा अॅण्ड्रॉईड किंवा इंटरनेट नसलेला साधा मोबाईल फोन वापरत असल्याचे उघड झाले. ३ नोव्हेंबरला त्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अॅप इन्स्टॉल करण्यासाठी ओटीपी आल्याचे गुन्हे शाखेला दिसले. गुन्हे शाखेने नारायणकडे चौकशी केली असता, त्याने ३ नोव्हेंबरला तो बाजारात गेला असताना एका अनोळखी व्यक्तीने विनवण्या करत त्याच्याकडे कॉल करण्यासाठी मोबाईलची मागणी केली.
नारायणने त्याला मोबाईल दिला असता त्याने नारायणच्या मोबाईलवर क्रमांकावर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केले. त्यानंतर, याच व्हॉट्सअॅपवरून धमकी व खंडणीचा संदेश मुंबई वाहतूक हेल्पलाईनवर पाठवल्याचे उघड झाले, तांत्रिक तपास केल्यानंतर धमकी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो गीतकार पाशा असल्याचे तपासात निष्पन्न झाले, त्यानुसार गुन्हे शाखेने पाशा याला ताब्यात घेत मुंबईत आणून वरळी पोलिसांच्या हवाली केले.