पुणे : सोलापूर रोडवरील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या गेटसमोर बॅरिकेट लावून पोलिस नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी स्पोर्टस बाईकवरुन आलेल्या तरुणाने बॅरिकेटला धडक देऊन तपासणी करणार्या पोलिसांना जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी १० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या गेटसमोर घडली आहे.
या अपघातामध्ये दोन पोलीस, कारचालक तसेच स्पोर्टस बाईकवरील तरुणी जखमी झाले आहेत. पोलीस अंमलदार संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, कारचालक चेतन सिंग आणि स्पोर्टस बाईकवरील सायली टिंगे अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी मनोहर भाऊ ओंबासे (वय-३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून स्पोर्टस बाईकचालक कार्तिक ढवळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी नाका येथील द्राक्ष बागायतदार गेटसमोर बॅरिकेट लावून नाकाबंदी सुरु होती. पोलीस नाकाबंदीदरम्यान एका कारची चौकशी करत होते. त्यावेळी लोणी काळभोर टोल नाका येथून स्पोर्टस बाईकवर कार्तिक ढवळे हा वेगाने आला . त्याने नाकाबंदीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटला जोरदार धडक दिली.
दरम्यान, पोलीस पथकात काम करत असलेले संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के यांना तसेच ज्यांच्या कारची तपासणी केली जात होती, ते चेतन सिंग यांना जोरदार धडक दिली. या धडकेत स्पोर्टस बाईकवरील तरुणी सायली टिंगे हिला खाली पडून गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोकडे करीत आहेत.