पुणे : पुणे शहरात जानेवारी महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या तयारी निमित्त विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजक आणि बँकांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे. त्यासंदर्भात मोठ्या बँका आणि उद्योजकांची बैठक येत्या काही दिवसांत आयोजित करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.
तसेच, जी-२० राष्ट्र समूहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशांत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे आणि औरंगाबादला या परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात परिषद होणार आहे. जी-२० परिषदेचे सदस्य शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळी भेटी देणार आहेत. परिषदेसाठी २० देशांचे २०० हून अधिक प्रतिनिधी पुण्यात उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहर सुशोभीकरणावर आणि रस्ते दुरुस्तीवर भर दिला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच आता बँका आणि उद्योजकांचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
दरम्यान, या परिषदेच्या निमित्ताने राज्याच्या अपर मुख्य सचिवांनी महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. शहरातील साठ चौक आणि वाहतूक बेटांचे कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. साठ पैकी ५२ ठिकाणची कामे सुरू झाली आहेत. ऐतिहासिक शनिवार वाड्यातील ध्वनिप्रकाश योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे.