पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ येथील ४ हजार ८८३ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील ७९२ सदनिकांचा सर्व सुविधांयुक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. यात शिल्लक असलेल्या एकूण १३३७ सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आतापर्यंत ३ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. या गृहप्रकल्पांतर्गत सदनिकांची सोडत यापूर्वी काढण्यात आली आहे.
शिल्लक राहिलेल्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया ११ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू असून ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ३०८५ लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाची नोंदणी केलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. तरी इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.