बापू मुळीक
सासवड: गुंजवणी योजनेचे काम हे 1993 च्या जुन्या कालव्याप्रमाणेच करून जिरायती भागाला पाणी देण्यासाठी माझा लढा हा सुरु राहणार आहे. या योजनेसाठी माझा विरोध नाही, तर चुकीच्या व ईपीसी पद्धतीने दिलेल्या कंत्राटाच्या ठेकेदार पद्धतीला विरोध आहे. शासन दरबारी वेळोवेळी पत्रव्यवहार, तसेच अधिवेशनात आवाज उठवला आहे. अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, अधिकारी आणि शेतकऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. पाण्याची गरज असलेल्या भागातून पाईपलाईन करण्यासाठी ठाम राहिलो आहे. 16 गावातून झालेल्या जुन्या सर्वे प्रमाणेच बंदिस्त पाईपलाईनचे काम करून आरक्षित सर्व क्षेत्राला लाभ देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांची नुकसान होईल, असे कोणतेही चुकीचे काम करणार नाही, असे आश्वासन संजय जगताप यांनी सांगितले. परिंचे ( ता. पुरंदर) या ठिकाणी प्रचाराच्या कोपरा बैठकीत आमदार जगताप बोलत होते.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, सन 2017 मध्ये गुंजवणीच्या बंदिस्त पाईपलाईनला मंजुरी मिळाली. सन 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर शिवतारे यांनी श्रेय घेण्यासाठी ईपीसी पद्धतीने एल ऍड टी कंपनीला कंत्राट दिले. या कंपनीने ईपीसी कंत्राटी पद्धतीचा गैरफायदा घेऊन जलवाहिनीच्या कामात बदल केला. वीर, समगीर गोटा, लपतळवाडी, जेऊर, मांडकी, पिंपळे, निरा या बागायती भागातून राख असा मार्ग होता, या चुकीच्या मार्गाला विरोध केला. 1993 च्या जुन्या कालव्याप्रमाणेच माहूर, परिंचे, हरणी, वालाच्या डोंगरातून राख तलावात पाणी सोडण्याची मागणी केली, असं देखील जगताप म्हणाले.
कामाला विलंब झाला तरी चालेल, पण शेतकऱ्याचे नुकसान होऊन देणार नाही. तसेच ठेकेदाराचा फायदा होणाऱ्या चुकीच्या कामाला शेतकऱ्यासह महाविकास आघाडीतील आमच्या सर्वांचा कायम विरोध राहणार असल्याचेही आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट सांगितले .