पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार टायरीलालागले आहेत. अशातच छगन भुजबळ यांच्या एका दाव्याने महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीपासून मुक्तीसाठी भाजपमध्ये गेल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत. ओबीसी असल्याने कारवाई झाल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हटले छगन भुजबळ?
राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असतानाच भुजबळांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. ओबीसी असल्याने माझ्या मागे यंत्रणा लागल्या आहेत. ईडीपासून मुक्ती मिळाली, त्यामुळेच भाजपसोबत गेल्याचा आनंद. असे छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात म्हटले आहे.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नोंदवण्यात आलं आहे. या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारणावर भाष्य करण्यात आले आहे. अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मी, नवाब मलिक, अनिल देशमुख तुरुंगात गेलो होतो. ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. शरद पवारांनाही याबाबत माहिती होती, पण ते अनुकूल नव्हते. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा या पुस्तकात करण्यात आला.
…म्हणूच कारवाई..
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला. कारण ईडीपासून सुटका, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी तर एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या आहेत. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.