पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. अशातच अनेक राजकीय पक्षात बंडखोरी झालेली दिसून येत आहे. अशातच महायुतीला पुण्यात बंडखोरी रोखण्यात यश आलं आहे तर मात्र महाविकास आघाडीला त्यात फारसं यश आलेलं दिसत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून नाराजीचे चित्र पाहायला मिळाले. तिकीट न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. आता या बंडखोरांविरोधात कारवाईला सुरूवात झाली आहे. काँग्रेसने राज्यातील बंडखोरांविरोधात कारवाई केली आहे. बंडखोरांना ६ वर्षे पक्षातून निलंबित केले आहे.
बंडखोर ६ वर्षे पक्षातून निलंबित…
पुण्यातील आबा बागुल , कमल व्यवहारे आणि मनिष आनंद या बंडखोरांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेसच्या इतर बंडखोरांवर देखील कारवाई होत आहे. मनीष आनंद, कमल व्यवहारे यांनी काँग्रेस सदस्यवताचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधून बंड केलेल्या अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. आबा बागुल पर्वती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. कमल व्यवहारे काँग्रेसचा राजीनामा देत कसबामधून निवडणूक लढवणार आहेत. तर मनीष आनंद हे सुद्धा काँग्रेसचा राजीनामा देत शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
बंडखोरी करणाऱ्यांविरोधात आता पक्षाने कारवाई करण्यास सुरूवात केली असून पुणे शहर काँग्रेसकडून प्रदेशाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांवर ६ वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुण्यातील कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधील उमेदवारांनी बंडखोरी केली होती.
..न केल्यास निलंबनाची कारवाई..
बंडाची तलवार म्यान करून त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा, असे काँग्रेसने त्यांना सांगितलं होतं. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने घेतला आहे. आता या बंडखोरांचे काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचं आहे. बंडखोरी करू नये, अशी पक्षाच्या नेत्यांनी भूमिका घेतली होती. त्यासाठी इच्छुकांची समजूत काढण्यात आली. अनेकांना वरिष्ठ नेत्यांनी देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अशामध्ये काही बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु, काहींनी उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.