उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात पेट्रोल पंपाच्या समोर मागील 2 ते 3 महिन्यांपासून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अवजड वाहंनामधून डीझेल चोरी केली जात आहे. अलिशान गाडीतून येऊन सदरची चोरी केली जात असून बुधवारी (ता. 06) पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांवर या डीझेल चोरट्यांनी थेट दगडाने हल्ला चढवला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत संबंधित नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांकडून नेहमीप्रमाणे एका कानाने ऐकले व दुसऱ्या कानाने सोडून दिले. एखादी मोठी घटना झाल्यावरच गुन्हा नोंदला जाणार का असा आरोप या नागरिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी यवत पोलीस ठाणे व उरुळी कांचन पोलिसांना वारंवार माहिती दिली तरीही अद्यापपर्यत या डीझेल चोरांना पकडण्यात उरुळी कांचन व यवत पोलिसांना यश आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील खेडकर मळा परिसरात हॉटेल सोनाई, हॉटेल गारवा, अशोका व त्याच परिसरात एक पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी अवजड वाहने थांबण्यासाठी मोठी पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला अवजड वाहनांचे चालक गाडी बाजूला घेऊन आराम करतात. यावेळी पुण्याच्या बाजूकडून नंबर नसलेल्या एका अलिशान गाडीतून काहीजण उतरून या ठिकाणी लावलेल्या गाडीतून डीझेल चोरी करून घेऊन जातात.
दरम्यान, यावेळी उरुळी कांचन व परिसरातील काही नागरिक पहाटे चालत जाण्यासाठी जातात. यावेळी काही नागरिकांनी हे डीझेल चोरी करीत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी गाडीतून डीझेल चोरी सुरु असतानाच डीझेल चोर टाकीला लावलेला पाईप तसाच ठेवून पुण्याच्या बाजूने निघून गेले. यावेळी यातील काही नागरिकांना या डीझेल चोरट्यांनी धमकावले. व त्या डीझेल चोरांनी या नागरिकांवर दगडाने हल्ला चढवला. तर चालकाला गाडीतून डीझेल चोरी होत असल्याची कोणतीही कुणकुण लागत नसल्याने गाडीतून सर्हासपणे डीझेल चोरी केले जात आहे.
याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एक नागरिक म्हणाले, “उरुळी कांचन व यवत पोलिसांनी वारंवार या गोष्टीची माहिती देण्यात आली आहे. पोलीस येतात, चौकशी करतात व त्या ठिकाणावरून निघून जातात. यामुळे सदर ठिकाणी येण्याचे तरी कष्ट कशाला करता. अशामुळे उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.”
पोलिसांना घटनेची माहिती तरीही दफ्तरी नोंद का नाही?..
डीझेल चोरी होत असल्याची माहिती वारंवार पोलिसांना दिली जात आहे. तरीही पोलिसांकडून अजूनही डीझेल चोरीचा कोणताही गुन्हा नोंदला जात नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. गुन्हा दाखल केला तर तपास करावा लागेल या भीतीने काही अधिकारी व कर्मचारी गुन्हा नोंद करीत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.
गुन्हे शोध पथकाची सुमार कामगिरी..
एखादा गुन्हा घडला, तर त्या ठिकाणची सर्व माहिती घेऊन तत्काळ त्या आरोपीपर्यत पोहोचण्याचे काम गुन्हे शोध पथकाचे आहे. मात्र, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची कामगिरी काहीच नाही. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे उरुळी कांचन व परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तर या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आपणच सावध होऊन आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. तर काही चोरट्यांचे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले आहे. तरीही अद्यापपर्यंत तपास लागू शकला नाही.
गस्त वाढवण्याची गरज..
वर्दळीच्या ठिकाणी चोरी, अपार्टमेंटमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पार्किंग असो वा रस्त्यालगत, तसेच दुकानाजवळ लावलेल्या दुचाकी व चारचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याबाबत उरुळी कांचन पोलिसांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, उरुळी कांचन पोलिसांकडून नागरिकांचा अपेक्षा भंग झाल्याची चर्चा सुरु आहे.