छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांनी एकत्र येऊन धाक दाखवून आणि कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचा आरोप दिवंगत नेते प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.
प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
या प्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात 18 ऑक्टोबर 2024 ला दावा दाखल केला असून, त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर 25 नोव्हेंबर रोजी पुढील तपासणी होणार आहे. तसेच या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. परंतु अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच यासदंर्भात लवकरच बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचंही सारंगी महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
जिरेवाडी येथील ही जमीन पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड मार्गालगत असून, ही जागा शासनाने रस्ते विकासकामासाठी संपादित केली आहे. उर्वरित जमिनीचा व्यवहार हा धनंजय व पकंजा मुंडे यांच्या संगनमताने गोंविद बालाजी मुंडे याच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गीते यांच्या नावे करुन आपली व आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोपही सारंगी महाजन यांनी केला आहे.
दरम्यान, सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.