दौंड : दौंड विधानसभा (१९९) मतदार संघातून 13 पुरुष तर 1 महीला असे एकूण 14 उमेदवार निवडणुक लढवत आहेत. या दौंड मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ३ लाख १९ हजार ३११ मतदार आहेत. अशी माहिती दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांनी दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरुण शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील ३१३ मतदान केंद्रांवर २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ३१३ मतदान केंद्रांपैकी काही मतदान केंद्रे ही महिला, दिव्यांग, युवा आदींकरिता विशेष साह्यकारी मतदान केंद्र म्हणून तयार केली जाणार आहेत. मतदानासाठी २९ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केले आहेत. मतदानाच्या आधी व मतदानाच्या दिवशी आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याकरिता दौंड, यवत, कुरकुंभ व पाटस येथे तीन भरारी पथके कार्यरत आहेत. त्याचबरोबर कासुर्डी, पाटस व दौंड शहर येथे तीन स्थिर पथके कार्यरत आहेत.
विधानसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ व १९ वय असलेल्या मतदारांची संख्या ८८५७ आहे. त्यामध्ये ५४८३ पुरुष, ३३७३ स्त्री व १ तृतीयपंथी मतदार यांचा समावेश आहे. टपाली मतांची संख्या ९१४ असून, त्यामध्ये दौंड येथील ४१०, पुणे जिल्ह्यातील ३२९ व इतर जिल्ह्यांमधील १७५ मतदारांचा समावेश आहे. ८५ पेक्षा अधिक वय असलेले आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असणारे एकूण ८३ मतदारांकरिता गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरला दौंड शहरातील नगर मोरी येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे.
दौंड विधानसभा निवडणूक :
-एकूण मतदार : ३१९३११
-महिला मतदार : १५५३८३
-पुरुष मतदार : १६३९१७
-तृतीयपंथी मतदार : ११
-८५ वर्षांवरील मतदार : ३८४८
-दिव्यांग मतदार : ३१६८
-सेवा मतदार : २९८