पुणे : विधानसभा निवडणुकीकांची रणधुमाळी सुरु झाली असून आता प्रचाराची रेलचेल सुरु झाली आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पुणे दौऱ्यामध्ये ठाकरे यांच्या पुण्यात सभा होणार आहेत. ९ नोव्हेंबरला कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी, तर १३ नोव्हेंबरला खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जाणार आहेत. मात्र या सभेची ठिकाणे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी पुणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेचे चार उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. दोन टप्प्यात ठाकरे यांच्या सभा होणार असून ९ नोव्हेंबरला कसबा आणि कोथरूड, तर १३ नोव्हेंबरला खडकवासला, हडपसर विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मात्र, या सभेची ठिकाणे अद्यापही निश्चित झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
मनसेने पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना हडपसरमधून, मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना खडकवासला, माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना कोथरूडमधून, तर कसबा विधानसभा मतदारसंघातून गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीला कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे केल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. पुणे शहरात मनसेला मानणारा वर्ग मोठा आहे, यापूर्वी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. यामध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक असते.