नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा IPO 6 नोव्हेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे. तुम्हालाही या IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक ब्रोकरेज फर्म्सनी गुंतवणूकदारांना फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy च्या IPO मध्ये पैसे गुंतवू नका, असा सल्ला दिला आहे.
कंपनीची आर्थिक कामगिरी आणि वाढीचा दृष्टीकोन सुधारेपर्यंत गुंतवणूकदारांनी प्रतीक्षा करावी, असेही म्हटले आहे. स्विगीचा आयपीओ रिटेल गुंतवणूकदारांसाठी आज 6 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. स्विगी पब्लिक इश्यूद्वारे 11,327.43 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. Swiggy IPO मध्ये 4,499 कोटी रुपयांच्या 11.54 कोटी इक्विटी शेअर्सचा ताज्या इश्यू आणि 6,828.43 कोटी रुपयांच्या 17.51 कोटी शेअर्सचा ऑफर-फॉर-सेल (OFS) समाविष्ट आहे.
सॅमको सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले की, स्विगी चांगले आर्थिक परिणाम आणि शाश्वत वाढीचा स्पष्ट मार्ग दाखवेपर्यंत प्रतीक्षा करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. कंपनीने 371 ते 390 रुपयांच्या दरम्यान प्राईस बँड निश्चित केला आहे. स्विगीने आर्थिक वर्ष 24 मध्ये तोटा नोंदवला होता. तरी यामध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.