पुणे : जिल्ह्यातील २१ पैकी सात विधानसभा मतदारसंघांत १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने या सात मतदारसंघांत दोन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत, तर उर्वरित १४ मतदारसंघांत एकच बॅलेट मशिन असणार आहे. कारण, ईव्हीएम मशिनवरील बॅलेट युनिटवर १६ बटणांची मर्यादा आहे. एक बटण हे नोटा मतासाठी असते. त्यामुळे १५ उमेदवार रिंगणात असतील, तर एकच बॅलेट युनिट वापरावे लागते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
डॉ. दिवसे म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुरंदर, चिंचवड, वडगावशेरी, हडपसर आणि पुणे कॅन्टोमेन्ट या सात विधानसभा मतदारसंघांत दोन बॅलेट युनिट असणार आहेत. तर, हडपसर आणि पुरंदर या दोन मतदारसंघांत प्रत्येकी १६ उमेदवार रिंगणात आल्याने नोटासाठी स्वतंत्र मशिन ठेवावे लागणार आहे.
विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पुणे शहराची मतमोजणी ही कोरेगाव पार्क येथील अन्न-धान्य गोदामात, तर पिंपरी आणि भोसरी मतमोजणी बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे. उर्वरित विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीही त्यांच्या मतदारसंघाच्या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिली.