उरुळी कांचन, (पुणे) : संशयितरीत्या घराबाहेर थांबलेल्या एका इसमाला उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका आजींच्या सतर्कतेमुळे व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. त्याला पकडून उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 05) रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन परिसरातील तुपे वस्ती परिसरातील आण्णासाहेब विठ्ठल तुपे यांच्या घराच्या बाहेर अज्ञात 4 ते 5 जण येऊन थांबले होते. यावेळी परिसरातील भटकी कुत्री जोरजोरात ओरडत असल्याने आण्णासाहेब तुपे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विठ्ठल तुपे यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. यावेळी त्यांना घराच्या बाहेर 3 ते 4 तरुण दिसून आले. तर गेटच्या आतमध्ये एक तरुण हा लाकडी दांडके व हातात दगडी घेऊन उभा असलेला दिसून आला.
आजींनी घरातील सदस्यांना माहिती दिली. तसेच मोबाईल फोन वरून परिसरातील नागरिकांना व शेजारी राहणाऱ्या तरुणांना माहिती दिली की, काही अज्ञात व्यक्ती या घराच्या बाहेर थांबले आहेत. त्यांच्याकडे लाकडी दांडके व हातात दगड आहे. सदर माहिती मिळताच परिसरातील अनिकेत तुपे, रोहित तुपे, अमित तुपे, नाना मोरे हे तरुण सदर ठिकाणी आले. यावेळी घराच्या बाहेर रेकी करणारे 3 ते 4 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तर गेटच्या आत थांबलेल्या एका इसमाला या चौघांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, तरुणांनी सदर इसमास उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानुसार पुढील कारवाई सुरु आहे. सदरचा इसम व त्याचे साथीदार कोणत्या कारणाने परिसरात फिरत होते याची अद्याप माहिती मिळू शकली नसून पोलीस काय कारवाई करणार व तपासात काय निष्पन्न होणार? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.