पुणे : वन्यजीव कायद्यान्वये बंदी असलेल्या हत्तीच्या केसांची ब्रेसलेट्स व अंगठ्यांची विक्री केल्याच्या आरोपावरून विश्रामबाग पोलिसांनी सोमवारी (दि. ४) सराफ व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्या दुकानातून जप्त करण्यात आलेले दागिने पडताळणीसाठी वन विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आले आहेत.
हत्तीचे केस बाळगणे अथवा त्यांची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, त्याचे सर्रास उल्लंघन करून हत्तीच्या केसांचे दागिने बनवून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून कुमठेकर रस्त्यावरील व्ही. आर. घोडके सराफ या पेढीच्या चालकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एका वन्यप्रेमी सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे.
हत्तीचे केस धारण केल्याने धारण करणाऱ्याला शक्ती आणि संरक्षण मिळते, असा समज प्रामुख्याने दक्षिण भारतीय नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे तेथे हत्तीच्या केसांचे ब्रेसलेट्स तसेच अंगठ्या वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. अलीकडच्या काळात हे लोण महाराष्ट्रातही पसरले आहे. के. व्ही. घोडके सराफ पेढीकडून हत्तीच्या केसांचे ब्रेसलेट्स व अंगठ्यांची सर्रास विक्री केली जात होती. तसेच त्याबाबत रेडिओवर जाहिरातही केली जात होती.
ही जाहिरात ऐकून एका वन्यप्रेमीने बनावट ग्राहक पाठवून अंगठीची खरेदी केली. ती तपासून पाहिली असता त्यामधील केस हत्तीचा असल्याचे आढळले. त्यानंतर या कार्यकर्त्याने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या दुकानावर छापा टाकून तेथील अंगठ्या व ब्रेसलेट्स जप्त केली.