पवनानगर, (पुणे) : मावळ तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाचीवाडी गावच्या कमानीजवळच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी (१ नोव्हेंबर) ३२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक करत पोलिसांनी घटनेचा उलगडा केला आहे. नीलेश दत्तात्रय कडू (वय ३२, रा. प्रभाचीवाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लहु रामभाऊ कडू (वय ४९, रा. सावंतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सर्व तांत्रिक बाबी तपासून मुख्य आरोपी अक्षय बाळू घायाळ (वय २८, रा. सावंतवाडी, महागाव मावळ), पियूष विश्वनाथ डोंगरे (रा. महागाव) आणि साहिल साईनाथ जाधव (रा. प्रभाचीवाडी) या तिघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा क्लिष्ट व संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सूचना व मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा घडल्यानंतर गुन्हयातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकूण तीन पोलीस पथके रवाना केली होती. सलग ३० तास तपास केल्यानंतर मोठ्या शिताफीने सापळा रचून गुन्हयातील मुख्य आरोपी घायाळ याला तळेगाव दाभाडे येथून ताव्यात घेण्यात आले.
मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीतून सदरचा खून हा उसनवारीने घेतलेले पैसे परत देण्याचे कारणावरून केल्याचे निष्पन्न झाले. त्याच प्रमाणे मुख्य आरोपीकडे केलेल्या चौकशीत या गुन्हयात वर नमूद डोंगरे आणि जाधव यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेतील मयत तरूण व मुख्य आरोपी यांच्यावर कामशेत व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.