संतोष पवार / पळसदेव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एसएससी परीक्षा (इ. १०वी) फेब्रुवारी / मार्च 2025 साठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना आता परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे.
त्यानुसार विद्यार्थी आता नियमित शुल्कासह बुधवार (दि. ६) पासून ते मंगळवार (दि. १९) पर्यंत अर्ज करू शकतात. तर विलंब शुल्कासह २० नोव्हेंबरपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. याबरोबरच माध्यमिक शाळांना परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे आणि RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे ४ डिसेंबरपर्यंत जमा करावयाची आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ग्राह्य धरण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षा अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावे. तसेच अतिविलंब शुल्कासोबत परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा लवकरच जाहिर करण्यात येतील, असेही राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्याचे परीक्षा अर्ज https://www.mahahsscboard.in/mr या अधिकृत वेबसाईटवरून त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत भरायचे होते. आता अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वाढीव मुदत देण्यात आली आहे.