लोणी काळभोर : मागील तीन महिन्यांपासून दररोज 10 ते 12 जणांच्या टोळक्यांचा धांगडधिंगा व दगडफेक सुरु आहे. हा प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरात होत आहे. हे सर्व टोळके नशा करून रस्त्यावरच आरडाओरडा व शिवीगाळ करतात. टवाळखोरांच्या त्रासाला नागरिक हैराण झाले आहेत. तर टवाळखोर नागरिकांना दमदाटी करीत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास नागरिक घाबरीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह उभा राहिला असून या टवाळखोरांवर लोणी काळभोर पोलीस कारवाई कधी करणार? रात्रीचे खेळ कधी थांबणार? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने इमारतींवर दगडफेक केली. तर एक रिक्षा फोडली. या टोळक्यांना पोलिसांकडे तक्रार करू. असे काही नागरिकांनी सांगितले होते. तेव्हा त्यातील मुलींनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील एका वीर बहाद्दराची ओळख सांगितली. व तुमच्याच विरुद्ध तक्रार देते. अशी धमकीही काही नागरिकांना दिल्याची माहिती मिळत आहे.
इंदिरा नगर, समता नगर व घोरपडे वस्ती परिसरातील 10 ते 12 जण या टोळक्यात आहेत. तर या टोळक्यात भैय्या, तुक्या, सोन्या, दाद्या अशी टोपण नावे असलेली फुसके दादा आहेत. या टोळक्यात एक मुलगी आहे. तिने यात दोन मैत्रिणी सामील केल्या आहेत. या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यावर बस्तान बसविले आहे. आणि या अड्ड्यावर रात्री 12 ते 2 या कालावधीत मुक्तपणे नशा केली जाते. अंगात नशा घुसल्यानंतर टवाळखोर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून स्टंटबाजी करतात. त्यानंतर या टोळक्याचा राडा होऊन रस्त्यावरच दररोज भांडणे होतात.
मागील काही दिवसापूर्वी ओम शिल्प बिल्डींगच्या जवळ एक तासाहून अधिक काळ धांगडधिंगा सुरु होता. यावेळी चौघांमध्ये मुलींवरून खूप मोठी हाणामारी झाली. तेव्हा मुलींची मोठी पळापळ झाली. या भांडणात एक मोबाईल रस्त्यावर फोडला. तर 5 ते 6 जण दुचाकीवरून मुलींचा शोधाशोध करत होते. यावेळी गाड्यांमधून मोठमोठे फटाके फोडून कर्णकर्कश आवाज काढण्यात आला. त्यामुळे परिसरात मोठे ध्वनीप्रदूषण झाले होते. मात्र मुली न मिळाल्याने सर्व टवाळखोर निघून गेले.
दरम्यान, टवाळखोर दररोजच या परिसरात धिंगाणा घालत आहेत. तर या ठिकाणी गोरख धंदाच सुरु झाला आहे. तर टवाळखोर बेदरकार गाडी चालवितात. याला वेळीच लगाम लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अन्यथा मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी शक्य तेवढ्या लवकर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
लोणी काळभोर पोलीस दररोज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत आहेत. मात्र घोरपडे वस्तीच्या रस्त्यावर रोजच टोळक्याचा धिंगाणा सुरु असतो. मात्र या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस एकदाही आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांचे गस्त केवळ नावालाच झाल्यामुळे या टवाळखोरांचे फावले आहे. लोणी काळभोर पोलीस प्रशासन या टवाळखोरांवर कारवाईचा बडगा कधी उगारणार? व रात्रीस खेळ चाले ? कधी थांबणार? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.