पुणे: सणासुदीच्या दिवसांत, उन्हाळी सुट्ट्यांच्या दिवसात रेल्वे प्रवासाला सर्वाधिक पसंती असते. आपल्या मूळ गावी, पर्यटनस्थळी, नियोजित दौरा करण्यासाठी १२० दिवस आधी रेल्वेचे आरक्षण करता येत होते. मात्र, भारतीय रेल्वेने आरक्षणाच्या नियमात मोठा बदल केला आहे. प्रवाशांना आता रेल्वे आरक्षण केवळ ६० दिवस आधीच करता येणार आहे. हा नवा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू करण्यात आला आहे, पण १ व २ नोव्हेंबरला सुट्टी आल्याने याची अप्रत्यक्षरीत्या अंमलबजावणी सोमवारपासून होईल.
रेल्वे प्रशासनाकडून नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकानुसार, १ नोव्हेंबर २०२४ पासून यात्रा करण्याचा दिवस वगळून तिकिटाचे बुकिंग ६० दिवस आधी करता येईल. या पत्रकात असे देखील म्हटले आहे की, १२० दिवसांपर्यंतचा बुकिंगचा नियम ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत लागू असेल. रेल्वे बोर्डाचे निर्देशक (पॅसेंजर मार्केटिंग) संजय मूनचा यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले होते. त्यानुसार सोमवारपासून प्रत्यक्षरीत्या या नव्या नियमाला सुरुवात झाली असून या नव्या नियमात ६० दिवस आधी करण्यात आलेल्या तिकिटाचे बुकिंग रद्द करण्याची परवानगीदेखील असणार आहे.
याच बरोबर ज्या रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचा कालावधी आधीपासून कमी आहे, अशा गाड्यांना हा नियम लागू असणार नाही. यात गोमती एक्स्प्रेस आणि ताज एक्स्प्रेस अशा गाड्यांचा समावेश आहे. विदेशी पर्यटकांना रेल्वेचे बुकिंग करण्यासाठी ३६५ दिवसांचा कालावधी असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.