मुंबई : महायुतीत समाधानकारक जागा मिळत नसल्याने बाहेर पडत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेल्या माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षा (रासप) ने राज्यभरात १२० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. ‘रासप’चे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड (परभणी) मधून पुन्हा रासपने उमेदवारी दिली आहे. स्वःत विधान परिषदेत असलेले जानकर विधानसभेच्या रिंगणात उतरलेले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात ३५, मराठवाड्यात ३१, विदर्भात २४, उत्तर महाराष्ट्रात १७, तर कोकणात ५ असे एकूण १२० उमेदवार रासपने राज्यभरात दिले आहेत. रासपने १२० पैकी ५० उमेदवार धनगर समाजाचे दिले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जानकर यांची भूमिका महायुतीला पूरक असल्याचे बोलले जाते. धनगर समाज महायुतीवर नाराज असल्याने तो महाविकास आघाडीकडे वळू नये, यासाठी जानकर यांना महायुतीने स्वबळावर लढण्याच्या सूचना केल्याचे सांगितले जात आहे. जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामतीत संदीप चोपडे या धनगर समाजातील तरुणाला उमेदवारी दिली आहे. रासपचे विद्यमान आमदार गुट्टे यांच्या मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नसून तेथे गुट्टे यांना भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे.