पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या एकाला चौघांनी कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २९) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धायरीगाव या परिसरात घडली आहे.
अमन रॉय, रोहीत, दिपक भंडारी व सुलतान (संपूर्ण नाव माहिती नाही) अशी खुनाचा प्रयत्न केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत सुरेश कांबळे (वय-१८, शिवशंभों बिल्डींग, फ्लॅट नं. १, कुंभार चावडी. भैरवनाथ मंदीरासमोर, धायरीगाव) असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडून गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २९) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धायरीगाव या परिसरात प्रशांत कांबळे ,संविधान वंजारी, साहील सुपेकर, संतोष पासवान असे भैरवनाथ मंदीरासमोर दुकानाशेजारी कट्टयावर गप्पा मारत होते. तिथेच प्रशांत याची भाजीची हातगाडी असते. संविधान वंजारी सोबत आरोपींचे जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाले होते. त्यांनी एकमेकांना शिवीगाळी करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रशांत हा वाद मिटवण्याच्या हेतूने मध्ये गेला असता, तेव्हा त्याला सुध्दा वरील चौघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, रोहीत, अमन रॉय, दिपक भंडारी व सुलतान हे परत रात्री साडेनऊच्या सुमारास तेथे आले. त्यावेळी रोहीतच्या हातामध्ये लोखंडी कोयता व दिपक भंडारी, अमन रॉय व सुलतान याच्या हातामध्ये बांबू होता. प्रशांत व मित्र पळून जात असताना प्रशांत याला पकडून बांबूने मारहाण करण्यात आली. रोहीत याने कोयत्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक शैलेश संखे, पोलीस निरिक्षक जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, फौजदार किशोरी साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा शोध सुरू आहे.