सांगली : विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या गाठीभेटी व फराळाच्या माध्यमातून नेतेमंडळीही ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत. अशातच रोहित पाटील उमेदवार असलेल्या कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे आणि दिवाळीच फराळ वाटप करण्यात आला. या प्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केली आहे. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील (वय-48) आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम (वय-35) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांची पदयात्रा सुरु होती. या पदयात्रेच्या पाठीमागे रोहित पाटलांचे काही कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून पैसे वाटताना दिसून आले. यानंतर संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी या रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना पकडून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. यावेळी तासगाव पोलीसांनी पूर्ण चौकशी व तपास करुन रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांविरोधात तासगाव पोलिसांनी पूर्ण चौकशी व तपास करून फिर्याद दाखल करून घेतली.
यावेळी रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून भरारी पथकाने झडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे 16 पाकिटे त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये पाचशे रुपयांच्या 111 नोटा आणि पाच हजार रुपये रोख अशी एकूण 1 लाख 8 हजार 500 रुपये इतकी रक्कम आढळून आली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.