जालना : मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. याआधी त्यांनी मतदारसंघांची यादी जाहीर केली होती. त्यांनी कालच रविवारी कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आणि कुठे उमेदवार पाडायचे याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आज जरांगे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आज विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलतना जरांगे पाटील म्हणाले, आम्ही विधानसभा निवडणुकीत आमच्या मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण की, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे आपल्यासाठी ते शक्य नाही. तसेच आम्ही राजकारणात सध्या तरी नवीन आहोत. आमचा उमेदवार उभा करुन तो पडला तर आमच्या जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला आहे.
यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाहीयेय. तसेच एका जातीवर पुढे जाणे शक्य नसल्याचे हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे, असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.