सांगली : विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या गाठीभेटी व फराळाच्या माध्यमातून नेतेमंडळीही ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत. अशातच रोहित पाटील उमेदवार असलेल्या कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे आणि दिवाळीच फराळ वाटण्याचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील गटाने केला आहे. या घटनेमुळे मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारीसाठी पाटील गटाचे समर्थकांनी एकच गर्दी केली आहे.
नेमकं काय घडलं?
शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप संजयकाका पाटील गटाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट व दिवाळी फराळ असे वाटपाचे काम सुरू असल्याचा संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ देखील काढला असल्याचं बोललं जात आहे.
तासगाव शहरातील साठेनगर भागात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे संजय काका पाटील यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की ‘अतिशय़ निंदनीय प्रकार असून मला कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे माहिती मिळाली आहे. उद्या-परवा मी तुम्हाला याबाबत पुराव्यानिशी माहिती देईन’, लाखो रुपयांचे आमिष दाखवून काहींना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचंही संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तासगाव शहरातील या घटनेची फ्लाईंग स्कॉडकडून संपूर्ण तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर फ्लाईंग स्कॉडकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पैसे वाटत असलेल्या कार्यकर्त्यांना संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला नेले आहे. त्यामुळे, मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातही या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पैसे वाटणाऱ्या एकाने आपण शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटत असल्याचे कबूल केल्याचाही दावा करत एक व्हिडिओ देखील संजयकाका पाटील गटाने सोशल मीडियातून सार्वजनिक करण्यात आला आहे.