सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सोलापूर जिल्ह्यातील काही तब्बल २८ गावांनी कर्नाटकात सामील होण्यासाठी ठराव करून फॅक्स देखील केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी ग्रामस्थांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सध्या हा सीमावाद न्यायालयात असताना देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर व सांगलीतील काही गावे कर्नाटकमध्ये येण्यास इच्छूक असल्याचे ट्विट केले होते. त्याचे चांगलेच पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जमिनीचा एकही तुकडा न देण्यासाठी प्रयत्न सुरु केले असताना हा प्रकार समोर आला आहे.
अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असून त्याचा ठराव देखील केला आहे. या निर्णयामुळे सगळेच गावे एकवटल्यामुळे हा मोठा पेच प्रसंग निर्माण होत आहे.
आम्हाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर देखील रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून या वैतागामुळेच आम्ही कर्नाटक सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी बोलणे झाले असून त्यांना फॅक्स देखील पाठवल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत.
तर मग आम्ही महाराष्ट्रात राहू कशासाठी ?
सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या मतदारसंघात होतो. मात्र, ते मुख्यमंत्री असून देखील आमच्या गावांचा विकास केला नाही. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील आम्ही २८ ते ३० गावांनी मतदानावर बहिष्कार टाकून देखील त्याची दाखल कोणत्याच लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. प्रशासन जर आमची दखलच घेणार नसतील तर मग आम्ही महाराष्ट्रात राहू कशासाठी असा सवाल ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.