बुलडाणा : बुलडाण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलडाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वकील शंकर चव्हाण यांच्यावर ४० ते ५० अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शंकर चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर चव्हाण हे बहुजन समाज पार्टीचे चिखली विधानसभेचे उमेदवार आहेत. शुक्रवारी रात्री शंकर चव्हाण हे मेहकर फाटा परिसरातील त्यांच्या हॉटेलवर लक्ष्मी पूजन आटोपून सहकाऱ्यांसह बसले होते. त्यावेळी ४० ते ५० जणांच्या टोळक्याने त्यांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
शंकर चव्हाण यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. शंकर चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शंकर चव्हाण यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी चिखली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. चिखली पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.