पुणे : शाळेतील बसमधून ये-जा करणाऱ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बसचालकानेच वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
सोमेश्वर घुले पाटील (वय ३५, रा. वडाची वाडी, उंड्री, ता.हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार मार्च, जून आणि १६ जुलै रोजी घडला आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कुल बसमधून शाळेत ये जा करीत असे. त्या दरम्यान त्यांच्यात ओळख झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. फिर्यादी हिला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहिती नसताना तिने होकार दिला. तेव्हा त्याने तिच्याबरोबर मार्च, जून २०२२ मध्ये जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. १६ जुलै रोजी ही मुलगी घरी उशिरा आली. तेव्हा तिच्या वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी मुलीकडे सखोल चौकशी केली यावेळी सदर मुलीने चौघांनी बलात्कार केल्याची माहिती दिली.
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी तातडीने कोंढवा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या मुलीकडे चौकशी केली. तेव्हा बसचालका बरोबर प्रकरण उघड होऊ नये, म्हणून तिने चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. वैद्यकीय तपासणीत तिचे शारीरीक संबंध आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमेश्वर घुले याला अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.