शिरुर: आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखाना कसा सुरू होत नाही, तेच मी पाहतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते बारामती येथील गोविंद बागेत कार्यकर्ते दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले असता पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यावर मी स्वतः पुढाकार घेऊन घोडगंगा साखर कारखाना सुरु करणार आहे. सध्या राज्याचे सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करीत आहेत. महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे. त्यामुळे राज्य अडचणीत आले आहे. विकासा बाबत जनतेला जागृत करणे आवश्यक आहे. राज्याचा विकासात देशात पहिला नंबर होता, परंतु आता सहावा नंबर आहे. इतर राज्य विकासात पुढे गेले आहेत. लोकांनी आपल्याबरोबर असताना त्यांना निवडून दिले, परंतु त्यांनी स्वार्थासाठी आपली साथ सोडली आहे.
१९८० साली माझ्याबरोबर ५८ आमदार निवडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत होतो. परंतु, ५२ आमदारांनी आमची साथ सोडत पक्षांतर केले होते. फक्त ६ आमदार माझ्या सोबत होते. पुढे झालेल्या निवडणुकीत ५२ आमदरांपैकी एकही आमदार निवडून आला नाही. अगदी तीच परिस्थिती या वेळीही होणार आहे. त्यांच्या विरोधात गेल्यावर संबंधित व्यक्तीच्या संस्था बंद केल्या जातात. कोणतीही कारखानदारी खासगी नाही, शेतकरीच कारखान्याचा मालक आहे. यासाठी आमदार अशोक पवार यांना शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी केले