मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन कसोटी सामन्यातील शेवटचा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यातील दुसरा दिवशी टीम इंडियाच्या डावाची चांगलीच घसरगुंडी उडत असतांना टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने धमाकेदार खेळी केली आहे. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने शुभमनला मोलाची साथ दिली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात आला. भारताने 28 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने या मालिकेत पहिल्यांदाच धावसंख्येच्या बळावर आघाडी घेतल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे टीम इंडियाला 17 दिवसांमध्ये जे जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं आहे.
शुभमन गिलने 184 बॉलमध्ये 90 धावांची झुंझार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला आहे. अजाज पेटलच्या फिरकी चेंडूवर डिफेन्स करताना बॅटचा स्पर्श होऊन बॉल स्लीपमध्ये मिचेलच्या हाती विसावला. टीम इंडिया अडचणीत असताना शुबमनने एक बाजू सांभाळून ठेवली पण दुसरीकडून विकेट्स जात राहिल्या. 86 वर 4 विकेट अशी परिस्थिती टीम इंडियाची होती, तिथून शुभमनने डावाची सूत्र हातात घेऊन डाव सावला होता. शुभमन गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर आघाडी घेतली आहे.
दरम्यान, पहिल्या दिवसाच्या खेळात भारताने 4 विकेट गमावल्या होत्या. संघातर्फे रोहित शर्माने 18 धावा, यशस्वी जयस्वालने 30 धावा, मोहम्मद सिराजने 0 धावा आणि विराट कोहलीने 4 धावा केल्या. रवींद्र जडेजा, सरफराज खानसारखे खेळाडूही मैदानावर जम बसवू शकले नाहीत. वॉशिंग्टन सुंदरने मात्र 38 धावांची आक्रमक खेळी करून धावांना गती दिली.