पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिसराची माहिती व्हावी, यासाठी बुधवारी (दि. ३०) सायंकाळी पोलिसांनी काढलेल्या रुट मार्चच्या वेळी एका रिक्षाचालकाने एका पोलिसाला शर्ट फाडून मारहाण केली. त्याच्यासह त्याच्या आई व पत्नीविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलीस अंमलदार अविनाश उत्तम कांबळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ दास चौधरी (वय ४०, रा. पर्वती) या रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याची पत्नी राणी सोमनाथ चौधरी आणि आई सीताबाई दास चौधरी (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे.
पर्वती पोलीस ठाण्यातील ७ पोलीस अधिकारी, ४३ पोलीस अंमलदार, बीट मार्शल व सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी या वसाहतीत रुट मार्च करत होते. रुट मार्च पूर्ण होऊन ते परतीच्या मार्गावर असताना जनता वसाहतीतील गल्ली नं. १०८ च्या दिशेने रिक्षाचालक चालला होता. बीट मार्शल खाडे व सुर्वे यांनी पोलिसांच्या जीपसाठी मार्ग करून देण्यासाठी त्याला रिक्षा रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले.
त्याने रिक्षा बाजूला न घेता रस्त्यामध्ये आडवी लावून रस्ता अडविला. त्यानंतर पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस त्याला समजावून सांगत असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचे कपडे फाडून धक्काबुक्की केली. तसेच, त्याच्या आईने व पत्नीने महिला पोलिसाचा चावा घेतला व तिला धक्काबुक्की केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.