मुंबई : शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केले होतं. त्यानंतर राज्यात त्याचे पडसाद बघायला मिळत आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून आता अरविंद सावंत यांच्या विरोधात सडकून टीका केली जात आहे. याप्रकरणी आता शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अरविंद सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार करत निवडणूक आयोगाने महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे आक्रमक..
अरविंद सावंत हे महाराष्ट्रातील महिलांना मूर्ख समजत आहेत. त्यांनी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द बोलला आहे. स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेतला जाणार नाही. तसेच सावंत यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तात्काळ लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांचा प्रचार करत असताना अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्यावर अपमानास्पद शब्द वापरत टीका केली होती. त्याबाबत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.