वडगाव आनंद: दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या शीतकरण वाहनातून आळेफाटा पोलीसांनी २३.७१९ किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलीस स्टेशनकडून पुणे जिल्हा सरहद्दीवर नाशिक रोडवरील बोटा खिंड येथील तपासणी नाक्यावर पोलीस व प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी दुग्धजन्य व इतर पदार्थांची वाहतूक करणाऱ्या शीतकरण वाहनातून आलेला २३ किलो गांजा पकडला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. सुदर्शन गोविंद डोंगरे (वय २४, रा. काळवाडी ता. जुन्नर) व देवसुंदर अमलेश मैत्री (वय ४८ रा.पूर्व मेदनापूर पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. आरोपींकडून सहा लाख रुपये किमतीचा गांजा व ४५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तागडे यांनी सांगितले.
मंगळवारी (दि. २९) पहाटे ३. ३० वाजण्याच्या सुमारास ट्रक नाकाबंदी पॉईंटवर आला असता पोलीसांनी सदर ट्रक थांबवून त्यांची तपासणी केली. त्यावेळी सदरचा प्रकार उघडकीस आला. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता ओडीसा येथून गांजा आणून जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात हा गांजा विक्रीस आणल्याचे कबूल केले. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सहा. पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, पोपट कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल शैलश वाघमारे, दिपक नांगरे, भुजंग सुकाळे, अमित मालुंजे, सचिन कोबल यांच्या पथकाने केली.