पाटणा: निष्णात निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज पक्षाला निवडणूक आयोगाने ‘स्कूल बॅग’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. बिहारच्या राजकारणात नव्याने जन्मलेला हा पक्ष विधानसभेच्या ४ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावत आहे. यात, नागरिकांनी ‘स्कूल बॅग’ या चिन्हापुढील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे.
जनसुराज पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय कुमार ठाकूर यांनी बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने जनसुराज पक्षाला ‘स्कूल बॅग’ हे निवडणूक चिन्ह वाटप केले आहे, त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत. आमच्या पक्षाच्या वतीने सुशील सिंह कुशवाहा (रामगड), किरण देवी (तरारी), मोहम्मद अमजद (बेलागंज) आणि जितेंद्र पासवान (इमामगंज-राखीव) हे शिलेदार पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या नावापुढील ‘स्कूल बॅग’ या चिन्हावर मोहोर लावत नागरिकांनी विजयी करावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले. ‘स्कूल बॅग’ या निवडणूक चिन्हामुळे जनसुराज पक्षाला जनमाणसात आपली पाळेमुळे घट्ट करण्यास मोठी मदत मिळणार आहे. कारण हे चिन्ह आकांक्षा व प्रगतीचे प्रतीक आहे.
‘स्कूल बॅग’चा शिक्षण व विकासाशी संबंध असतो. म्हणून हे चिन्ह मिळण्याकडे पक्षाचे नेते सकारात्मक दृष्टीने बघत असल्याचे ठाकूर यांनी पुढे बोलताना नमूद केले. दरम्यान, बिहारमधील बालकांना दर्जेदार शिक्षण देत शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवण्यास प्रशांत किशोर यांचे विशेष प्राधान्य आहे. राज्यातील दारूबंदी धोरणातून प्राप्त पैसा या कामासाठी खर्च करण्यात येईल, अशी ग्वाही संजय कुमार ठाकूर यांनी दिली. बिहारमध्ये तरारी, रामगड, बेलागंज व इमामगंजमध्ये १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.