पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरात रोज गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहेत. कधी कोयता गँग तर टोळीयुद्धातून एकमेकांवर भरदिवसा होणाऱ्या हल्ल्यांमुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गाडीवर बसलेला एक तरूण हातातील बंदूक दाखवत दहशत माजवत आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील अपघातांमुळे कायम चर्चेत असलेल्या नवले ब्रिजच्या पुढे वारजेकडे जाताना लागणाऱ्या ब्रिजवर दोन तरूण मोटारसायकलवर निघाले होते. यावेळी याच रस्त्यावरून अनेक वाहने देखील जात होती. त्यावेळी त्यातील एकजण बाईक चालवत आहे, तर मागे बसलेल्या एका तरूणाने हातात बंदूक घेत गाडीवाल्यांवर उगारत त्यांनी भीती दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
यादरम्यान एक चारचाकीमधील एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलध्ये कैद केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेतील संबंधित तरुण अद्याप बेपत्ता असून पुणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, हा थरारक व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर दिल्या आहेत. शिवाय अनेकांनी या तरुणांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.
गृहमंत्री कमकुवत असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान : सुप्रिया सुळे
शहरातील वारजे पूल ते नवले पूल दरम्यान भरदिवसा बंदूक नाचवत दहशत पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. भाजपाप्रणीत महायुती सरकारच्या काळात गृहमंत्री कमकुवत असल्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले. त्याची कटू फळे सर्वसामान्य जनतेला भोगावी लागत आहेत. महाविकास आघाडी अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करुन पुणे आणि राज्यभरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.