पुणे : माजी सैनिकाने पार्किंगच्या वादातून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 31) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील अशोकनगर परिसरात घडली आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत दिलशाद शहानवाज मुलानी (वय 33 वर्ष, रा. श्रीराम मित्र मंडळ अशोकनगर, येरवडा, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी श्रीकांत शामराव पाटील (45 वर्षे, रा. श्रीराम मित्र मंडळ अशोकनगर, येरवडा, पुणे) याला अटक केली आहे. या घटनेत फिर्यादी यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. शहाजान मुलाणी असं गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येरवड्यातील श्रीराम मित्र मंडळ अशोकनगर येथे राहण्यास आहेत. त्यांच्याच शेजारी राहणारे श्रीकांत पाटील यांनी जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगच्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी यांचे पती शहानवाज मुलानी यांच्या डोक्यावर बंदुकीतून गोळी मारून गंभीर जखमी केले. या गोळीबारात शहाजान मुलाणी हे गंभीर जखमी झाले. मुलाणी हे अत्यवस्थ असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपस येरवडा पोलीस करत आहेत.