तांदुळवाडी : राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपाने मला तयारी करायला लावली होती. मात्र ऐनवेळी माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केल्याने आपण पक्षावर नाराज झालो होतो. मात्र आमचे नेते माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर नाराज नव्हतो. परंतु, आता वरिष्ठ पातळीच्या नेत्यांबरोबर माझी चर्चा झाली असून आपली नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे आपण महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्याबरोबर असून त्यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नुकतीच ही माहिती दिली. भाजपाचे आणि संघाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव हे भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून नाराज होते. त्यामुळे ते बंडखोरी करतील काय, अशी चर्चा मतदारसंघात होती. मात्र, कदम यांची शिवाजी कर्डिले, देशाचे राष्ट्रीय महामंत्री अनिल जैन, तसेच केंद्रीय तसेच राज्यस्तरीय नेत्यांबरोबर चर्चा झाली आहे.
तसेच तुम्हाला संधी देऊन आमच्याबरोबर घेऊ, असे वरिष्ठ नेत्याने सूचक वक्तव्य केले आहे. आम्ही कालही भाजपाचे होतो आणि आजही भाजपाचे आहोत. भाजप हीच आमची ओळख असल्यामुळे आम्ही पक्षाला कधीही सोडणार नाही. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यानुसार आम्ही महायुतीचे उमेदवार माजी आ. शिवाजी कर्डिले यांचेच काम करू, असे देखील यावेळी सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.