उरुळी कांचन, (पुणे) : स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या 10 ते 12 जणांच्या पोलीस पथकाने यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकला आहे. दारू व दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे 6 हजार लिटर कच्चे रसायन, 420 लीटर गावठी हातभट्टीची दारूसह 2 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी (ता. 31) यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडामोडी खामगाव फाटा येथे अक्षय गुडदावत हा गावठी हातभट्टी दारूभट्टी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच त्याच्याकडे गावठी हातभट्टीची तयार दारूचा मोठा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार घाडगे यांना बातमी मिळाली होती.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचा स्टाफ मदतकामी घेऊन पंच व पोलीस स्टाफ यांच्या सहाय्याने जाऊन पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी अक्षय गुडदावत हा दारू तयार करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा व झाडाझुडपांचा फायदा घेऊन त्या ठिकाणावरून पळून गेला.
दरम्यान, पोलिसांनी पाहणी केली असता दारु तयार करण्यासाठी लागणारा 6 हजार लिटर कच्चा माल, तयार गावठी हातभट्टीची दारू, 35 लिटर मापाचे भरलेले 12 कॅन्ड व हातभट्टी गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 2 लाख 72 हजार 600 रुपयांचा साठा पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, योगेश नागरगोजे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चोरमले, आव्हाळे, तुपे, वानखेडे यांनी केली आहे.