पुणे: पुणे शहरातील पर्वती आणि कसबा या दोन विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांना प्रचारात सक्रिय करण्याची कामगिरी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पार पडली आहे. मोहोळ यांच्या शिष्टाईमुळे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
कसबा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने १७ महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीच्यावेळी भाजपचे माजी सभागृह नेता धीरज घाटे यांनी कसब्यातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. तेव्हा स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटे यांची समजूत काढली होती. या पोटनिवडणुकीत मात्र हेमंत रासने यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात घाटे यांनी शहराध्यक्षपदाची सूत्रे योग्य पद्धतीने सांभाळत मोहोळ यांचा लोकसभेचा विजय साकार केला होता. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा कसब्यातून संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, भाजपच्या नेतृत्वाकडून रासने यांना संधी देण्यात आली. मोहोळ यांनी किमान पर्वतीमध्ये नाही, तर कसब्यात तरी रासने यांना उमेदवारी दयावी, यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, घाटे हे नाराज झाले होते.
सोमवारी शिवाजीनगरमधील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि पर्वतीमधील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तेव्हा ते गैरहजर राहिले. तर, श्रीनाथ भिमाले हे पर्वतीमधून इच्छुक असताना पक्षाकडून मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली. भिमाले हेसुद्धा नाराज होते. मात्र, त्यांनी बंड केले नाही. त्यांनाही पुन्हा सक्रिय करण्याची जबाबदारी ही मोहोळ यांनी पार पडली. त्यांनाही कसब्याचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर करून भाजपमधील नाराजी दूर करण्याचे काम त्यांनी पार पाडले.