बापू मुळीक
सासवड : भाजपचे गंगारामदादा जगदाळे यांनी मंगळवारी (दि. २९) जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गराडे येथील निवासस्थानी आई शकुंतला जगदाळे, पत्नी सुनंदा जगदाळे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर शिवतीर्थ चौकात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. सासवड शहरातून भव्य रॅलीने ते प्रशासकीय भवनात दाखल झाले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य गिरीष जगताप, अॅड शिवाजी कोलते, जालिंदर जगताप, राज्य प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष सचिन लंबाते, पुरंदर खरेदी विक्री संघाचे संचालक सागर आबा जगताप, माजी सैनिक सुभेदार सुधाकर यादव, ह.भ.प.सुनिल महाराज फडतरे, विलास खेसे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष साकेत जगताप, हवेली तालुका महिला अध्यक्ष वैशालीताई पवार, दयानंद फडतरे, दिलीप कटके, विठ्ठल जगताप, अॅड स्वप्नील होले, डॉ. संदिप नवले, सूरज औचरे, रोहित खवले यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.