पुणे : राज्यातील रास्त भाव दुकानदारांनी १ नोव्हेंबर २०२४ पासून धान्य वितरण बंद करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव व रास्त भाव दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये याविषयी तोडगा निघाल्याने बंद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करावी, या प्रमुख मागणीसह अनेक वर्षांपासून प्रलंबित न्याय हक्क मागण्यांबाबत, अखिल महाराष्ट्र राज्य धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे व ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन, पुणे यांच्या वतीने, शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४ पासून धान्य उचल व वितरण बंद करण्याबाबतचे निवेदन शासनास सादर करण्यात आले होते.
या निवेदनाच्या अनुषंगाने प्रधान सचिव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी रास्त भाव संघटनेच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेत मागण्यांवर चर्चा केली. चर्चेअंती संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने अखिल महाराष्ट्र राज्य धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे व ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन, पुणे यांच्या वतीने धान्य वितरण बंद करण्याबाबतचा निर्णय स्थगित केला आहे.